देवी दुर्गाच्या या 5 मंदिरांमागे आहे अद्भुत अशी पौराणिक कथा; तुम्हीही नक्की भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला सर्वात जास्त आणि विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या नऊ दिवसाच्या काळात देवी दुर्गा स्वतः धरतीवर 9 रूपात अवतरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतात. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरांना अवश्य भेट देतात. तुम्ही देखील या नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या मंदिरांना भेट देण्यासाठी इच्छुक असाल तर या मंदिरात जाणे कधीच चुकवू नका. कारण प्रत्येक मंदिराची आहे वेगळी पौराणिक कथा.

माता वैष्णो देवी मंदिर

नवरात्रीच्या काळात माता दुर्गेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक वैष्णोदेवी मंदिरात दररोज येत असतात. या मंदिराची उंची जमिनीपासून 5200 फूट आहे. वैष्णोदेवीचे मंदिर हे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. श्रद्धेनुसार, जो कोणी वैष्णो देवीचे दर्शन घेतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे हे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

मनसा देवी मंदिर

उत्तराखंडमध्ये असलेले मनसा देवी मंदिर मातेच्या भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराला देखील हिंदू धर्मात सर्वात जास्त मान्यता आहे. या मंदिरात जो भाविक मनसा देवीचे दर्शन घेण्यासाठी येतो त्याच्या सर्व इच्छा देवी पूर्ण करते असे म्हटले जाते. हे मंदिर हरिद्वारपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवालिक टेकडीच्या बिलवा पर्वतावर बांधले गेले आहे. याठिकाणी मनसा देवीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी असते.

नैनीताल मंदिर

उत्तराखंड येथील नैनी तलावाच्या काठावर बांधलेले नैना देवीचे मंदिर भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. या मंदिराबाबत अशी मान्यता आहे की, देवी सतीचे डोळे ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात येऊन जो कोणी नैनीताल देवीचे दर्शन घेतो त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदते. यामुळे हजारो भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात.

चामुंडा देवी मंदिर

हिमाचल प्रदेशात स्थित असलेले चामुंडा देवीचे मंदिरही माता दुर्गेच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. चामुंडा देवी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. असे मानले जाते की, मंदिराच्या आत एक तलाव आहे ज्यामध्ये स्नान केल्याने लोकांची सर्व पापे धुवून जातात. चामुंडा देवी मंदिर मुख्यतः देवी कालीला समर्पित आहे. या मंदिराला हिंदू धर्मात विशेष मान्यता आहे.

कामाख्या मंदिर

आसामची राजधानी गुवाहाटी येथील नीलाचल टेकडीच्या मध्यभागी कामाख्या देवीचे मंदिर आहे. कामाख्या देवीचे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये स्त्रीच्या योनीची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये देवीचे मासिक पाळीचे कपडे भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात. या कारणामुळेच हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये पुरुषांसह महिला जास्त प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.