पुणे । पुणे शहर कोरोना विषाणूच्या विळख्यातून कधी मुक्त होईल असा प्रश्न पडत असताना शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील १५ दिवसांत शहरात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या कोरोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात कालपर्यंत ३ हजार ९३ इतकी रुग्णसंख्या होती. यांपैकी १ हजार ६३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या पुणे शहरातील अनेक रूग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरात ५ हजार रुग्ण असतील अशी शक्यता आयुक्त शेखर गायकवाड व्यक्त केली.
दिलासादायक बाब म्हणजे, येणाऱ्या काही दिवसात शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या जरी वाढत राहिली तरी त्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक राहणार आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही आयुक्त गायकवाड यांनी नमूद केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”