मनपा निधीतून शहरातील 81 रस्ते होणार गुळगुळीत

औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील 111 रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरू होतील. त्यासोबतच मनपा निधीतून शंभर कोटी रुपये खर्च करून 81 रस्ते गुळगुळीत करण्याचे नियोजन सुरू आहे. अंदाजपत्रक तयार करून प्रशासकांची लवकरच मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर लगेच निविदाही काढण्यात येणार आहे. निविदेत 50 कोटींचे दोन पॅकेज तयार केले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बि.डी. फड यांनी दिली.
प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील जास्तीत जास्त रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्मार्ट सिटीतून 317 कोटी रुपये खर्च करून 111 रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या कामाची निविदा निश्चित झाली असून ए.जी. कन्स्ट्रक्शन्सने सर्व रस्त्यांची कामे घेतली आहेत. महापालिकेने 2022-23 अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानुसार प्रशासन पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या सूचनेनुसार रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता फड यांनी शंभर कोटीतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
शहरातील 81 रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून या रस्त्यांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. तर त्यांच्या यादीमध्ये बदलही होऊ शकतो. अंदाज पत्रक तयार केल्यानंतर प्रशासक यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन त्यात बदल होतील.