औरंगाबाद : शहराच्या चारही बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे बनविण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. भागवत कराड यांनी दिली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. अग्रवाल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर खा. डॉ. कराड यांनी ही माहिती दिली.
यामध्ये नगर नाका, मिटमिटा ते दौलताबाद, औरंगाबाद पैठण, ए. एस. क्लब ते शिर्डी किमान सातशे कोटी रुपये खर्च असलेल्या महामार्गाचे काम जलदगतीने होणार आहे. त्यासाठी साईबाबा संस्थान शिर्डी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पन्नास टक्के भागिदारीतुन हे काम होणार आहे. याचबरोबर शहरातील जालना रोडवर मुकुंदवाडी, अमरप्रीत हॉटेल समोर, आणि आकाशवाणी चौकात उड्डाणपूल करावेत, अशी मागणी यावेळी खा. कराड यांनी केली.
कन्नड येथील औटम घाटामध्ये बोगदा प्रस्तावित आहे. पण त्यावर किमान पाच हजार कोटी रुपये खर्च येत आहे. त्यामुळे घाटामध्ये सरसकट चौपदरीकरण करण्यात येईल, बोगदा ऐवजी डोंगर कापुन सरळ अकरा किलोमीटर चौपदरीकरण केले तर खर्चही कमी येईल आणि वाहतूकही अडथळा येणार नाही. त्यामुळे या महामार्गाचे घाटामध्ये चौपदरीकरण होणार असल्याची माहितीही आढावा बैठकीतुन समोर आली. या रस्त्याच्या कामामुळे औरंगाबादच्या विकास कामाला अजून वेग येणार आहे.