या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी या १३ शहरांवर केंद्र सरकारने आपले लक्ष एकवटले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या १३ जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे. ते या सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलले आहेत.

या १३ शहरामध्ये मुंबई, दिल्ली/नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता/हावडा, पुणे, हैद्राबाद, ठाणे, इंदूर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्ट (तामिळनाडू), थिरुवल्लूर (तामिळनाडू) या शहरांचा समावेश आहे. या सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या शहरांसाठी सरकरने नियमावली जाहीर केली आहे. या शहरांमध्ये निश्चितता दर, मृत्यू दर, दुप्पट दर, तसेच प्रति १० लाख लोकांमागे चाचणी दर असे नियोजन या भागांसाठी करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोन केसेसचे मॅपिंग आणि संपर्क याद्वारे निश्चित केले जावे असे सांगण्यात आले आहे. यामुळे एक भाग निश्चित करून तिथे काटेकोर संचारबंदी पाळता येईल असे केंद्र सरकारचे मत आहे.

यापुढे संचारबंदी वाढवायची की नाही यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अमित शहा यांनी सर्व राज्यांशी चर्चा केली आहे. जरी संचारबंदी वाढविण्याचा निर्णय झाला तरी मोठ्या प्रमाणात नियम शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. सरकार विशेषतः वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या शहरावर लक्ष ठेवून असेल. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता यांचा समावेश आहे.  शाळा, महाविद्यालये बंद राहतील. आंतरराष्ट्रीय विमानांवरही बंदी असेल. धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. सलून उघडले असले तरी जीम आणि मॉल उघडण्याचाही निर्णय राज्य सरकरवर सोपविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.