औरंगाबाद : गेवराई पेट्रोलपंपवार घरी परतणाऱ्या पंपचालकाची कार अडवून तीन चोरट्यानीं कारच्या काचा फोडून पावनेचार लाखांची रक्कम लांबवल्याची घटना रविवारी गेवराईजवळ घडली. थरारक पद्धतीने ही लूट केली गेली. ओमप्रकाश मदनराव बेदरे ( रा. गजानननगर,गेवराई) आणि अमोल दिलीप कुलथे यांचा भागीदारीत पेट्रोल पंप आहे.
रविवारी दिवसभरात जमा झालेली 3 लाख 76 हजार 850 रुपयांची रक्कम एका काळ्या बॅगमध्ये घेऊन ओमप्रकाश बेदरे रविवारी रात्री 11 वाजता स्वतःच्या कारमधून (एमएच 23 एडी 4011) घराकडे निघाले होते. राष्ट्रीय पेट्रोलपंपा पासून अंदाजे तीनशे मीटरवर रस्ता दुभाजाक ओलांडण्यासाठी ते थांबले असता अचानक शहागडच्या दिशेने एक विनाक्रमांकाच्या कारमधून तीन चोरटे आले आणि त्यांनी बेदरे यांच्या कारसमोर त्यांची गाडी आडवी लावली.
त्यापैकी दोघे बेदरे यांच्याजवळ आले आणि ‘पैसे दे, अन्यथा जिवे मारुत ‘ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर एकाने टॉमीने कारचे काच फोडले आणि पुढील सीटखाली ठेवलेली पावनेचार लाखांची रक्कम असलेली बॅग घेतली व तिघेही कारमधून पसार झाले. याप्रकरणी ओमप्रकाश बेदरे यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी चोरट्यावंर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.