महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले

कराड | मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झारखंड राज्यातील हैदर हजारीबाग भागातील पारसनाथ आवधेश कुमार यादव याच्यासह त्याचा कामगार दिलीप कुमार हे दोघेजण कराडातील तुषार कदम यांच्या पोकलॅन मशीनवर कामास आहेत. सध्या हे मशिन भारत गॅसच्या सीएनजी गॅस पाईपलाईन कामासाठी वापरण्यात येत असून मालखेड गावच्या हद्दीत खुदाईचे काम सुरू आहे. गुरूवारी रात्री काम संपल्यानंतर पारसनाथ व त्याचा कामगार दिलीप कुमार हे पोकलॅन मशिनमध्येच झोपी गेले. शुक्रवारी पहाटे अज्ञात तिघांनी त्यांना उठवले. संबंधितांच्या हाताच चाकू व कोयता होता. कोयत्याने हात तोडण्याची धमकी देऊन त्या तिघांनी पारसनाथ याच्याकडील पैसे, अंगठी, मोबाईल तसेच दिलीप कुमार याच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते तिघेजण तेथुन पसार झाले.

चोरट्यानी तोंड रुमालाने बांधल्यामुळे पारसनाथ व दिलीप कुमार यांना त्यांचा चेहरा पाहता आला नाही. घटनेनंतर पारसनाथ याने त्याच्या कामाचे ठेकेदार आत्माराम नलवडे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

You might also like