Wednesday, June 7, 2023

थर्टी फर्स्टचा प्लॅन करताय ? तर काय आहे नियमावली

औरंगाबाद – मुंबईसह राज्यभरात मागील दोन दिवसात कोरोनाचा विस्फोट पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचे उपाय लागू करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्याने तसेच इतर जिल्ह्यांतील स्थिती पाहता, जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. शहरात 26 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठीही काही नियम लागू करण्यात आले आहेत.

शहरासाठीचे नियम कोणते ?
– रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीनंतर मोठ्या संख्येने एकत्र येऊन थर्टी फर्स्ट पार्टीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
– हॉटेल आणि सर्व प्रकारची दुकाने पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र त्यांना आसन क्षमतेच्या 50 टक्केच परवानगी देण्यात आली आहेत.
– बंदिस्त जागेतील लग्न समारंभात, कार्यकर्मात उपस्थितांची संख्या 100 पेक्षा जास्त नसावी.
– सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्य आणि मेळावे किंवा तत्सम कार्यक्रम बंदिस्त जागेत असल्यास त्यासाठीही 100 नागरिकांचीच परवानगी आहे.

– मोकळ्या जागेत 250 किंवा क्षमतेच्या 25 टक्केपेक्षा जास्त नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नाही.
– क्रीडा स्पर्धेत क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त गर्दी नसावी.
– चित्रपटगृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, जिम्नॅस्टिक, स्पा इत्यादी ठिकाणीही 50 टक्के उपस्थितीचा नियम लागू आहे.
– बाजापेठेत एखाद्या दुकानात 50 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेवर ग्राहक दिसून आल्यास संबंधित दुकान काही महिन्यांकरिता सील करण्यात येईल.
– गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.