हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आणि भारतात प्रत्येक जाती धर्माचा सण हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारताचे हे वैशिष्ट्य आहे की, सगळे लोक मिळून एकत्र हे सण साजरे करतात. ईद असो दसरा असो किंवा दिवाळी असो सगळेजण एकत्र मिळून सहभाग घेतात. नुकतेच आता दसरा तोंडावर आलेला आहे. आणि या दसरा दिवाळीच्या निमित्ताने सगळेच जण आनंदाने रावणाचे दहन करत असतात.
एक मुस्लिम कुटुंब पाच पिढ्यांपासून रावणाचा पुतळा बनवत आहे. हे कारागीर मथुरेहून पुतळे बनवण्यासाठी येतात. यानंतर ते दीड महिना येथे राहून पुतळा बनवतात. यावेळी 105 फुटांचा रावण बांधण्यात येत आहे. याशिवाय कुंभकर्ण 90 फूट उंच असेल. पुतळा बनवणारे कारागीर मोहम्मद राजा खान यांनी सांगितले की, सुमारे वीस लोकांची टीम पुतळा बनवण्यासाठी दररोज 16 तास काम करत आहे. त्यांचे कुटुंब पाच पिढ्यांपासून दसऱ्याच्या वेळी पुतळे बनवत आहे. या काळात तो हिंदूंचे अनेक नियम पाळतो.
मोहम्मद राजा खान यांनी सांगितले की, ते कुटुंबासह मथुराहून जयपूरला येतात. या काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब राम मंदिरात असते. सकाळी उठून आंघोळ केल्यावरच तो पुतळा बनवायला सुरुवात करतो. तसेच या काळात ते सात्विक अन्नाचे सेवन करतात. मंदिराच्या आवारात आयोजित रामलीला पाहण्यासाठीही तो जातो. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलांना रामलीला दाखवून ते त्यांना चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करतात.
मुस्लीम कुटुंबांनी पुतळे बनवण्याचे काम ६८ वर्षांपूर्वी सुरू केले होते. तेव्हापासून या मैदानात रावण दहन केले जात आहे. पुतळा बनवणाऱ्यांपैकी चांद मोहम्मद यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी 1966 मध्ये पहिल्यांदा वीस फुटांचा पुतळा बनवला होता. त्यावेळी त्यांना मजुरी म्हणून 250 रुपये मिळाले होते. याशिवाय चांगले काम केल्याबद्दल दहा रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत हे काम पुढे नेत आहेत.




