हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रामध्ये GBS चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (GBS) प्रतिबंध आणि उपचारासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे. महत्वाचे म्हणजे, सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड आणि धायरी या गावांत GBS रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेने राजाराम पूल ते खडकवासला दरम्यानचा भाग ‘GBS बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे.
रुग्णांसाठी वैद्यकीय मदत
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात चार न्यूरोलॉजिस्ट सेवा देण्यास सज्ज झाले आहेत, त्यापैकी एका तज्ञ डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. तसेच, बाधित क्षेत्रातील रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळेल, तर अपात्र रुग्णांनाही एक लाख रुपयांची मदत महापालिका करणार आहे.
दरम्यान, GBS चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी खासगी टँकरचालकांसोबत बैठक घेतली आहे. तसेच, शहरात स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक टँकर चालकाला २५ किलो ब्लिचिंग पावडर देण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय
शहरात संशयित GBS रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेने ‘GBS आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ सुरू केला आहे. या कक्षाशी 020-25506800, 020-25501269 किंवा 020-67801500 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन PMC च्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.
रुग्णांना महापालिकेच्या योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी PMC ने शहरातील प्रमुख रुग्णालयांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय, बाधित गावांमध्ये ‘मेडिक्लोर’च्या ३० हजार बाटल्यांचे वाटप महापालिकेने सुरू केले आहे. जेथून नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यास मदत होईल. महापालिकेच्या या उपक्रमांमुळे बाधित भागातील GBS संसर्ग आटोक्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेबाबत उपाययोजना, वैद्यकीय मदत आणि वित्तीय सहाय्याच्या माध्यमातून महापालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व उपाययोजना राबवत आहेत.