हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी यंदाची उन्हाळी सुट्टी वेगळीच ठरणार आहे. कारण की, शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) यावर्षी “निपुण महाराष्ट्र अभियान” (Nipun Maharashtra Abhiyan) अंतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांना सुट्टीतही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. या निर्णयानंतर अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष मोहीम
या उपक्रमाचा उद्देश राज्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांची भाषा व गणितीय कौशल्ये सुधारण्याचा आहे. विशेष म्हणजे, ३० जूनपूर्वी दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने किमान ७५% अध्ययन क्षमता गाठावी, असा शासनाचा आदेश आहे. यासाठी अनुदानित, खाजगी, अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना हा उपक्रम बंधनकारक करण्यात आला आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र तो ऐच्छिक असणार आहे.
सांगायचे म्हणजे, ही मोहीम ५ मार्च ते ३० जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सातत्याने प्रगती तपासली जाणार आहे. दर आठवड्याला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शिक्षकांना बंधनकारक असेल. यासाठी “चावडी वाचन” आणि “गणन कार्यक्रम” घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
थोडक्यात, यंदाच्या उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना अध्यापन करावे लागणार असून त्यांच्या या कामगिरीचे मूल्यमापनही होणार आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, विहित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येईल. मात्र, उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांना अचानक भेटी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांवरही अधिक जबाबदारी येणार आहे. त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता या निर्णयाबाबत शिक्षक वर्ग काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.