यंदा दहावी आणि बारावीचा निकाल १५ मेपूर्वी लागणार; शिक्षण मंडळाने दिले संकेत

results
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Board of Higher Secondary Education) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल यंदा वेळेआधी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी वेगाने सुरू आहे, त्यामुळे येत्या १५ मेपूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

यंदा निकाल वेळेआधी का जाहीर होणार?

गेल्या काही वर्षांपासून मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होत होता. मात्र, यंदा दोन्ही परीक्षा १० दिवस आधीच सुरू झाल्यामुळे निकाल देखील लवकर जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जलदगतीने सुरू आहे, निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

परीक्षांसाठी घेतलेले कडक नियम

  • – यंदा परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी शिक्षण मंडळाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते.
  • – ज्या केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी परीक्षा देत होते, त्या केंद्रांवर संबंधित शाळेच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नव्हती.
  • – इतर शाळांतील शिक्षक, पर्यवेक्षक आणि कर्मचारी परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात आले.
  • – परीक्षांच्या सुरळीत आणि निर्भय वातावरणात आयोजनासाठी कडक नियम लागू करण्यात आले.

पुरवणी परीक्षा कधी होणार?

निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये पुरवणी लागेल, त्यांच्यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल आणि त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी संधीही उपलब्ध होईल.

३१ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार

यंदा महाराष्ट्रभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी सुमारे ३१ लाख विद्यार्थी बसले होते. उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना वेळेत निकाल मिळावा यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्नशील आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर तो पाहता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाची पाहणी करावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.