सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाही आहेत. यासंबंधी उदयनराजे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे. अखिल विश्वाचे पोट भरणा-या बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती या आणि अशा अनेक बाबींचा विचार करुन, आम्ही आमचा दरवर्षी साजरा होत असलेला २४ फेब्रुवारीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याप्रसंगी शुभेच्छा स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणा-या तमाम व्यक्तींनी, आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये असं जाहिर आवाहन उदयनराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केलं आहे.
आमच्यावर प्रेम करणा-या लाखो-करोडो मनांचा उत्साह पाहील्यावर तमाम व्यक्तींच्या मनाचा आदर ठेवण्याकरीता जनसेवेच्या कामांचा शुभारंभ अथवा जनसेवेच्या कार्याची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तथापि अलीकडच्या काळात, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पहाता, आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हास उचित वाटत नाही. असं स्पष्टीकरण उदयनराजेंनी आपला वाढदिवसा साजरा न करण्याबाबत पत्रकात दिलं आहे. वाढदिवस करण्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्ती करत परस्पर त्यांना मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत असेही उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.