महावीर जयंतीनिमित्त: सत्य, प्रेम, अहिंसेने जग जिंकूया.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भगवान महावीरांच्या विचारांची तीव्र गरज ¶

महावीर जयंती|संकेत मुनोत

आज अनेक ठिकाणी द्वेष, हिंसा, मत्सर, घृणा वाढत असतांना भ. महवीरांच्या विचारांची तीव्र गरज वाटते.
मनुष्य जन्माने नव्हे कर्माने मोठा होतो हे स्वतःच्या संयमित जीवनातून सांगणारे वीर महावीर
भ.महावीर चोवीसावे तीर्थंकर होते. जैन धर्म हा कुठल्याही धर्माची शाखा नसून तो एक प्राचीन आणि स्वतंत्र धर्म आहे.

महावीरांचा जन्म झाला तेव्हा काळ असा होता की सगळीकडे कर्मकांडाचे स्तोम माजले होते, मुक्या जीवांना यज्ञात बळी चढवले जात होते, स्त्री फक्त भोगवस्तू होती, पददलित आणि दुर्बलांना छळले जात होते. निवडक लोक विद्वत्तेची मक्तेदारी सांगत सामान्य जनांचे शोषण करत होते.सामान्य जणांना ज्ञान घेण्याचा वा देण्याचा अधिकार नव्हता.
महावीरांनी अशा काळात त्या सर्व पीडितांना दुर्बलांना बळ दिले शिवाय शोषण करणार्यांचा अहंगंड दूर केला. त्याकाळी विद्वान संस्कृत भाषा बोलत जी सामान्यजनांना समजत नसे पण महावीरांनी सामान्य जनांशी अर्धमागधी या बोलीभाषेतून संवाद साधला, जसा ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून साधला.
कुठलाही धर्म म्हटले चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न विचारायचे नाही , जो कोणी प्रश्न विचारेल तो धर्मद्रोही असा आघात असतो, आज तर सरकार ला ही प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते.पण भ. महावीर या उलट सांगतात.ते ईश्वरवादी किंवा वेद प्रामाण्यवादी सिद्धांत मांडण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी सिद्धांत मांडतात.
‘पण्णा समीख्खए धम्मं’ अर्थात धर्माची प्रज्ञेने समीक्षा करा असे भ. महावीर म्हणतात.त्यांनी माणसा-माणसातील वर्णावरून, लिंगावरून होणारी विषमता नाकारली. त्यांच्या सोबत श्रमण श्रमणी आणि श्रावक श्रविकांमध्ये राजापासून रंकापर्यत, म्हाताऱ्यापासून लहानापर्यत, पुरुष- स्त्रिया हे सर्व होते.

त्यांची काही तत्वे पाहूया

लोकशाहीचा पाया- अनेकांतवाद

एखाद्या गोष्टीचा सर्वांगीण विचार म्हणजे अनेकांतवाद. परस्परांच्या मतांचा आदर करणे त्यात अभिप्रेत आहे.
आपल्यातील अनेक जण एखाद्या व्यक्तीबद्दल, महापुरुषाबद्दल, विचाराबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेऊन जगत असतात.
म्हणजे माझ्या एखाद्या जवळच्याने सांगितलंय, परंपरेत आलंय, या-या पुस्तकात वा ग्रंथात आलय, घरातील कुणी जवळच्याने सांगितलंय म्हणजे हे असेच असेल ती जवळपास वावरणारी व्यक्ती असे-असे चुकीचेच असेल किंवा असे असे बरोबरच असेल अस मानून आपण मोकळे होतो.
पण बहुतेक वेळा सत्य ते नसते सत्य त्यापलीकडे असते.प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर आणि सर्व बाजु समजून घेतल्यावरच आपण मत बनवायला हवे.
अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट. अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट. म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच बाजूचे मत न बनविणे.यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उदाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी कधीच पाहिलेला नाही . हत्तीच्या शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या पायाला हात लावणारा ओरडतो – हत्ती खांबासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो – हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. कानाला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो – हत्ती सुपासारखा आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते .
प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला, सुप इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते. त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक आहे. अनेकांतवाद कट्टर पणाचा मुडदा अहिंसक मार्गांनी पाडतो! अहिंसेचा जन्म असा मनात आहे .प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे .तो ज्ञानातून होणार आहे. हे स्पष्ट दिसणारे वैज्ञानिक सत्य स्वीकारायला शौर्य लागते. स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही.
आपले आधीचे मत चुकीचे होते हे स्वीकारायलाही खूप धैर्य लागते ज्यांनी हे स्वीकारले ते परिवर्तन घडवत पुढे जातात.
अनेक व्यक्तीबद्दल आपण असे पूर्वग्रहदूषित मत बनवून चालतो त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष संवाद साधत नाही आणि गैरसमज वाढत जातात.या अनेकांतवादाच्या मार्गाने आपण नातेसंबंध, समाज , देश आणि जग अधिक जवळ आणून ते अधिक समृद्ध करू शकतो.
सोशल मीडिया चा वापर करतांना ही हे तत्व आपण अमलात आणले तर अनेक धोके टळू शकतात, काही ही फॉरवर्ड केल्यामुळे आजपर्यत अनेक लोकांच्या झुंडीकडून हत्या झाल्या त्या टाळता येणे शक्य होते.

अपरिग्रह:*
जेवढी गरज आहे तेवढाच संचय करायला हवा आपण अनेक वेळा गरजेपेक्षा अधिक संचय करतो.
आत्ताच्या काळाच्या हिशोबाने सांगायचे तर माझ्या मते तुम्ही तुमच्या कुटुंबाची सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पाडू शकाल एवढा संचय पुरेसा आहे.पण आपण चार पिढ्यासाठी साठवून ठेवत बसतो.

अचौर्य-

चोरी न करणे
दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूवर स्वतःचा हक्क सांगणे किंवा ती लुबाडणे ही एक प्रकारची चोरी च आहे.

चुका आणि क्षमा-
क्षमा मागणे, क्षमा करणे ही वीराची लक्षणे आहेत भ्याडाची नव्हे.
चुकीबद्दल क्षमा मागीतल्याने वा क्षमा केल्याने कोणी छोटा वा मोठा होत नाही.
पण चुका मान्य करण्यात आपला अहंकार आडवा येतो. एखादा आपल्या चुका मान्य करीत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी एकतर त्याला वेड्यात काढतो, गुन्हेगार ठरवतो किंवा मग त्याच्या सदीच्छेचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेता येईल या विवंचनेत असतो.

अहिंसा-
अहिंसा भ्याडपणाचे नव्हे तर शूरपणाचे लक्षण आहे. समोरचा माझ्यावर हल्ला करत असताना मी समोरच्यवर प्रतिहल्ला ही करणार नाही, पळूनही जाणार नाही, समोरच्या बद्दल वैरभावही मनात आणणार नाही आणि अन्यायही सहन करणार नाही अस महात्मा गांधी म्हणत. शारीरिक अहिंसेपेक्षाही भावनिक अहिंसा अधिक महत्वाची आहे. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव होणे आणि मनाला वेदनाही होणे हे आपण योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो.
2020 पर्यंत मानसिक नैराश्य हा सर्वात मोठा आजार असेल व मृत्यूचे मोठे कारण असेल असा जागतिक अहवाल सांगतो.त्यामुळे मानसिक हिंसा टाळायला हवी.

द्वेष- कुणाबद्दल ही मनात द्वेष ठेवू नये.
सध्याच्या संदर्भात सांगायचे तर कोणी विरोधक असेल, कोणाशी वाद झाला असेल वा काही मतभेद असतील तर स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी लगेच दुसऱ्याच्याबद्दल वाईट पसरवले जाते, द्वेष केला जातो जे समाजासाठी घातक आहे. लबाडी करून तात्पुरते असे करण्यात आपल्याला यश मिळत असले तरी आपल्या या कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगावे लागते हे आपण विसरून जातो.

मैत्रिभाव-
मित्ति मे सव्व भू देसु
वैरं मज्झणम् केणवि।।

म्हणजेच सर्व प्राण्यांशी मम मैत्री
राहो न वैर कोणाशी।।
म्हणजे तो फक्त प्राणीच नव्हे तर मनुष्यही तो कोणीही असो कोणत्याही जातीचा, वा कोणत्याही धर्माचा, वयाचा, लिंगाचा , वर्गाचा असो त्याच्याप्रति मैत्रिभाव ठेवायची आज गरज आहे.वेगवेगळ्या जाती व धर्मावरुन आपल्या देशात तेढ निर्माण होत असतांना या विचारांचे अनुकरण करणे महत्वाचे आहे.

हिंसेने आणि द्वेषाने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात हे आज जगानेही मान्य केले आहे कल्पना करा काही देशांनी युद्ध करायचे जरी ठरवले तर एकमेकांवर बॉम्ब टाकता टाकता जग काही मिनिटांत संपू शकते त्यामुळे जगापुढे अहिंसा हाच एकमेव पर्याय आहे.
भ.महावीर आणि बुद्ध गेल्यावर हजारो वर्षांनी जेव्हा या अहिंसेची खिल्ली उडवली जाऊ लागली तेव्हा महात्मा गांधीनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून जगभर राज्य गाजवणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध पूर्ण देश एकत्र करून स्वातंत्र्य मिळवून दाखवले.मंडेला, मलाला, मार्टिन अश्या जगभरातील लोकांनी तो मार्ग स्वीकारुन जागतिक परिवर्तन घडवून आणले. त्यामुळेच तर जगतिक कीर्तीचा वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन ही म्हणाला कि महात्मा गांधींचे अहिंसक विचार च या जगाला वाचवू शकतील.

तर चला अहिंसा, प्रेम आणि नम्रतेने जग जिंकूया, आपले नाते संबंध, समाज , देश , जग अधिक बळकट करूया.

संकेत मुनोत
8087446346
[email protected]

(लेखक सामजिक कार्यकर्ते , अहिंसक विचारांचे अभ्यासक ,टीव्ही पॅनेलिस्ट आणि युवा व्याख्याते आहेत)

Leave a Comment