Saturday, March 25, 2023

गरवारे मैदानावर हजारो वाहने भंगारात पडून; क्रीडा विभाग मात्र अंधारात

- Advertisement -

औरंगाबाद – शहरातील गरवारे मैदानावरील खुल्या जागेवर मनपाने तीन वर्षांपूर्वी १३२ तर गेल्या तीन दिवसात फक्त २१ भंगार वाहने टाकण्यात आली आहेत. उर्वरित वाहने पोलिसांनी टाकली असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मैदानाच्या परिसरात हजारो वाहने भंगार वाहने पडून असताना मैदानाची जबाबदारी असलेला क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे.

मनपाच्या गरवारे मैदानावर दररोज हजारो नागरिक मॉर्निंग वॉक तसेच जॉगिंगसाठी येतात. तसेच पोलिस व सैन्य भरतीसाठी अनेक तरुण देखील याठिकाणी येऊन तयारी करतात. त्यांना गेल्या काही दिवसांपासून मैदानाच्या परिसरातील भंगार वाहने, तसेच विद्युत विभागाने टाकलेल्या जुन्या पोलचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गामुळे नागरिक सुरक्षित अंतर पाळून मैदानाच्या मोकळ्या जागेत व्यायाम करतात. पण दिवसेंदिवस मोकळी जागाच कमी होत आहे. कारण या जागेचा वापर भंगार वाहने टाकण्यासाठी केला जातो.

- Advertisement -

तीन वर्षांपूर्वी महापालिकेसह आरटीओ, पोलिस प्रशासनाने शहरातील भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबविली होती. त्यावेळी १३२ वाहने उचलून मैदानातील खुल्या जागेत टाकण्यात आली. उर्वरित वाहने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी टाकल्याचे यांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा कार्यकारी अभियंता डी. के. पंडीत यांनी सांगितले. गरवारे मैदानासंदर्भातील सर्व निर्णय क्रीडा विभागातर्फे घेतले जातात. पण भंगार वाहने याठिकाणी टाकताना क्रिडा विभागाला कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही वाहने कधी व कुणी-कुणी टाकली याविषयी क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे.

भंगार वाहनांचा लिलाव कधी होणार ?
सुमारे अडीच ते तीन वर्षांपासून हजारो भंगार वाहने या ठिकाणी पडून आहेत. यातील १३२ वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ही फाईल लेखा विभागात आहे. लवकरच याविषयी निर्णय होईल, असे कार्यकारी अभियंता पंडित यांनी सांगितले.