सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
महाबळेश्वर येथे घराचे काम सुरु असताना तेथील साहित्य चोरुन साताऱ्यात विक्रीसाठी आणले जात असताना एलसीबीने मुद्देमाल व एक पिकअप जप्त केली आहे. संशयित तिघांमध्ये एकजण मोक्का गुन्ह्यातील आरोपी आहे. दरम्यान, पोलिसांनी चोरीतील 1 लाख 66 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रवीण चंद्रकांत घाडगे (रा. एरंडल ता. महाबळेश्वर), निकेत वसंत पाटणकर, आकाश ज्ञानेश्वर कापले (दोघे रा. चंदननगर, कोडोली, सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 10 जानेवारी रोजी महाबळेश्वर येथून अज्ञात चोरट्यांनी पॉलिकॅब वायर, कटर मशीन, ड्रील मशीन, प्लंबींगचे साहित्य चोरुन नेले होते. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पथक (एलसीबी) तपास करत होते. दि. 19 रोजी एलसीबी पथकाला साताऱ्यात चोरीचे साहित्य काहीजण विक्री करण्यासाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावला असता पिकअप चारचाकी वाहनासह तिघांना पकडण्यात आले. संशयिताकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी महाबळेश्वर येथे चोरी केलेले साहित्य असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचे साहित्य जप्त करुन संशयितांना अटक केली.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, संदीप भागवत, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पोलिस अजित कर्णे, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, अमोल माने, प्रवीण पवार, केतन शिंदे, नवनाथ शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.