कराड | भुदरगड तालुक्यातील बंद पवनचक्क्यांचे तब्बल 68 लाखांचे साहित्य चोरत असतानाच नऊ जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. या टोळीत सातारा जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. पवनचक्क्यांच्या साहित्याशिवाय संशयितांकडून वाहन, मोबाईलसह 1 कोटी 30 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : भुदरगड तालुक्यातील जकीनपेठ येथे म्हातारीचे पठार आहे. त्या पठारावर काही पवनचक्क्या बंद स्थितीत आहेत. त्या पवनचक्क्यांचे साहित्य चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे होत्या. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दि. 25 कारवाई करत पवनचक्कीचे 68 लाखांचे साहित्य चोरून नेताना 9 जणांना अटक केली. या टोळीत पाटण तालुक्यातील तारळे येथील दोघे, तर सातारा शहरातील एकाचा समावेश आहे. प्रशांत जाधव, संतोष जाधव (दोघे रा. तारळे, ता. पाटण), तानाजी एकनाथ पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. यांच्याशिवाय टोळीत दोन परप्रांतीयासह सात जणांचा समावेश आहे.
विंड कंपनीच्या पवनचक्की बंद स्थितीत आहेत. त्या ठिकाणचे साहित्य चोरून नेण्यासाठी रात्री उशिरा तेथे आले होते. पवनचक्कीचे मौल्यवान मिश्रधातूचे अवजड पार्ट गॅस कटरने कापले. कापलेले साहित्य क्रेनच्या मदतीने कंटेनरमध्ये भरले होते. त्याचवेळी ही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून चोरी करतानाच चोरट्यांना रंगेहात पकडले. त्यात पवनचक्कीचे महागडे साहित्य जप्त झाले आहे.