वाढदिवस साजरा करणाऱ्या युवतीसह तिघांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले

Karad Taluka Police Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक शांत असे ठिकाण निवडून कोणीही नसलेल्या ठिकाणी गेलेल्या दोन मैत्रिणीसह त्यांच्या मित्राला लुटण्याची घटना टेभू, ता. कराड इथे घडली आहे. मैत्रिणीसह तिच्या मित्र व मैत्रिणीला अज्ञात तीन अज्ञात इसमानी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत कोयत्याचा धाक दाखवून लुटले आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून संबंधित इसमांचा शोध घेतला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरापासून काही अंतरावर असलेल्या सैदापुर, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका महाविद्यालयातील युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. तिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याचा निर्णय तिचा मित्र सचिन कोळी व मैत्रिणीने घेतला. सबंधित मित्राने आपल्या मैत्रिणीला फोनवरून मॅसेज करून आपण बाहेर जाऊन वाढदिवसाचा केक कापूया, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी कराड शहराबाहेर जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सबंधित मित्र सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे मैत्रिणीला आणण्यासाठी गेला. तर वाढदिवस असलेली युवती आणि तिची मैत्रीण विद्यानगर यथील एका महाविद्यालयासमोर थांबल्या. त्याठिकाणी सबंधित त्यांचा मित्र सचिन गाडी घेऊन आला. त्याने त्यांना गाडीत बसवून कृष्णा कॅनॉलवरून ओगलेवाडी रस्त्याने टेंभू गावच्या हद्दीतील डोंगराच्या दिशेने नेले. त्यावेळी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी तिघेजण उभे राहिले. रात्रीचा अंधार असल्यामुळे त्यावेळी अचानक तीघेजण त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयते होते. त्या तिघा जणांनी इतक्या रात्रीच्या वेळी तुम्ही इथे कशाला आलाय? का थांबला आहात?, असे प्रश्न विचारले. त्या तिघांनी सचिन कोळीसह दोन्ही युवतींना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्या तिघांना तुमच्याकडे असलेले मौल्यवान साहित्य, ऐवज काढून द्यावे, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी दोघिपैकी एका युवतीच्या कानातील कर्णफुले काढून घेतली. तसेच तिघांचेही मोबाईल त्यांनी काढून घेतले. इतकेच नाही तर त्या तिघांना कारमध्ये घालून अज्ञातानी त्यांची गाडी डोंगराच्या दिशेने नेली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी काहीजण त्यांच्याकडे असलेल्या बॅटऱ्यांतून उजेड पडू लागल्याचे सबंधित दरोडेखोरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी युवक व दोन युवतीकडून घेतलेली कर्णफुले आणि मोबाईल असा सुमारे 70 ते 72 हजार रुपये किमतीचे साहित्य लुटून पलायन केले. यानंतर सबंधित युवक व युवतीनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या पालकांच्या कानावर घातला. त्यानंतर सर्वांनी या घटनेची माहिती कराड तालुका पोलीस ठाण्यात जाऊन दिली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.