तिचा संघर्ष : एका फायटीत वातावरण टाईट, पुसेगाव- सातारा मार्गावर थरारक अपहरण नाट्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुसेगावमध्ये मध्यरात्री एका महिलेसह बाळाला, मुलीला आणि युवती असलेली गाडी पळवून अपहरण करण्याचा डाव उधळला. संशयित युवकाने कारमध्ये जबरदस्तीने घुसून कार पळवली. अशावेळी कारमधील सर्वचजण भेदरलेले होते. मात्र, या परिस्थितीमध्येही महिलेने अर्धा किलोमीटरपर्यंत झालेल्या झुंजीत एका फायटीत बाहेर फेकले अन् थरार थांबला. यानंतर अवघ्या 3 तासात पुसेगाव पोलिसांनी रात्रीच सर्च आॅपरेशन राबवून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात अभिजित ज्ञानदेव फडतरे (वय- 31, रा. फडतरवाडी, नेर, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अ‍ॅड. जयश्री महेश गोरे (वय- 35, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 रोजी मध्यरात्री घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार अ‍ॅड. जयश्री गोरे या दि. 25 रोजी दुपारी पती अ‍ॅड. महेश, मुलगा विश्‍वजित (वय- 4 महिने), मुलगी वेदांतिका (वय- 8), भाची रुपाली (वय- 21) व त्यांचे दाजी उत्तम होळ यांच्यासोबत कामानिमित्त शिखर शिंगणापूर व नातेपुते येथे गेले होते. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ते नातेपुतेहून साताराकडे कारमधून (एमएच- 11- सीजी- 8181) यायला निघाले होते. रात्री 12 वाजता ते पुसेगाव येथे आल्यानंतर तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी शिवाजी चौकात कार थांबवली.

यावेळी कारमधून अ‍ॅड. महेश गोरे व उत्तम होळ दोघेही खाली उतरले व पाणी बॉटल आणण्यासाठी गेले. यावेळी कारमध्ये अ‍ॅड. जयश्री गोरे ड्रायव्हर सीटलगत बसल्या होत्या व त्यांच्याजवळ त्यांचे लहान बाळ होते. तर पाठीमागे मुलगी व भाची बसलेली होती. पती व दाजी काही अंतरावर गेले असतानाच अचानक कारमध्ये अंदाजे एक 25 वर्षीय युवक ड्रायव्हर सीटवर बसताच तक्रारदार यांनी अनोळखी युवकाला ‘तू कोण आहेस? खाली उतर,’ असे म्हणताच त्याने कार स्पीडने चालवण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने आरडाओरडा करताच संशयित युवकाने साताराच्या दिशेने कार घेत महिलेला दमदाटी करण्यास सुरुवात केली. दमबाजी करतच तो चालक कार दामटवत होता. यावेळी कारमध्ये महिला व त्या चालकांमध्ये जोरदार झटापट सुरू होती.

या झटापटीत तान्हे बाळ सीटवरुन खाली पडले. सुमारे 7 मिनिटे हा थरार सुरु असतानाच महिलेने पुन्हा हॅन्ड ब्रेक ओढत पायाने स्टेअरिंगवर लाथ मारली. यामुळे संशयिताचा कारवरील ताबा सुटला व कार येरळा नदीचा मुख्य रस्ता सोडून मातीच्या असलेल्या ढिगावर जावून आदळून थांबली. ड्रायव्हर बाजूचा दरवाजा निघाल्यानंतर संशयित युवकाने अंधाराचा फायदा घेवून तेथून पळ काढला.

दरम्यान, अज्ञाताने कार पळवली असल्याचे पाहताच अ‍ॅड. जयश्री गोरे यांच्या पतीसह चौकात असलेल्या इतर नागरिकांनी कारचा पाठलाग सुरू केला. कार थांबलेल्या ठिकाणी हे सर्वजण पोहोचले. कारमधील सर्वजण भेदरलेले असल्याने त्यांना शांत केले. संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो पसार झाला.

या घटनेनंतर पुसेगाव पोलिस ठाण्यात जावून तक्रार देण्यात आली. रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलिसही गांगरुन गेले. सपोनि संदीप शितोळे यांनी तात्काळ गस्तीवर असलेल्या पोलिसांना अलर्ट करत कोरेगाव डीवायएसपी गणेश किद्रे यांना सांगितले. पोलिसांनी पथक तयार करुन संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुसेगाव व कोरेगाव पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन राबवून अवघ्या 4 तासात पुसेगाव ते दहिवडी रस्त्यावरुन एका हॉटेल नजीक फिरत असताना संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेबाबत विचारणा केल्यानंतर त्याने कबुली दिली. दरम्यान रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमध्ये सपोनि संदीप शिंदे, सह पोलीस हवालदार एस. एस. भोसले, पोलीस हवालदार डी. बी. बर्गे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलिस नाईक सुनिल अब्दगिरे, महिला पोलीस नाईक पी. एल. जगदाळे, पोलीस शिपाई महेश पवार यांनी सहभाग घेतला होता .

Leave a Comment