सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील फलटणहुन पुण्याच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी गाडी हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये तब्बल अडीच टन गोमांस आढळून आले आहे. गोमांस आणि गाडी चालक पोलिसांच्या ताब्यात असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासाठी वाठार स्टेशन येथील हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तब्बल सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर व थरारक पाठलागानंतर वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात पिकअप पकडण्यात आली. फलटण तालुक्यात राजकीय वरदहस्तामुळे गोवंशाची बेसुमार कत्तली सुरू असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अशी की, फलटण पोलिसांना हुलकावणी देवून (क्र. एम एच ४२,ए क्यू २०१९) गाडी वाठारच्या दिशेने सुसाट निघाली होती. तिचा चालक महादेव शिवाजी कुंभार(वय २५, रा.देशमुखवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व साथीदार अक्षय बाळासाहेब कुंभार (वय २२, रा. आसू, ता. फलटण) यांच्यावर वाठार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून, दोन हजार पाचशे किलो गोमांस जप्त केले आहे. मागील बाजूस भाजीची क्रेट लावून ही वाहतूक केली जात होती. ही गाडी वाठार स्टेशनमार्गे पुण्याकडे निघाली असल्याचे समजते. याबाबत शिवम चव्हाण (रा. वाठार स्टेशन) याने फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करत आहेत.