महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिले करोडोंच्या भेटवस्तू, जॅकलिनने ED ला काय सांगितले जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणाच्या तपासाला तोंड देत असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अंमलबजावणी संचालनालयासमोर अनेक खुलासे केले आहेत. या चौकशीदरम्यान अभिनेत्रीने सांगितले की,”चंद्रशेखरने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. ” त्याचवेळी, तिने एजन्सीला असेही सांगितले की, तिला त्याची खरी ओळख माहित नव्हती. एका मीटिंगमध्ये सुकेशने स्वतःची शेखर वेला अशी ओळख करून दिली, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.

ईडीने जॅकलिनची अनेकदा चौकशी केली. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांना नुकतीच ईडीने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत अटक केली होती. त्याच्यावर दिल्लीतील तिहार तुरुंगातून खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. रॅनबॅक्सीचे माजी मालक शिवेंद्र सिंह यांच्या पत्नी अदिती सिंग हिची 200 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक केल्याच्या प्रकरणाचीही ईडी चौकशी करत आहे.

अभिनेत्रीने ईडी अधिकार्‍यांना सांगितले की,”तिला 2021 च्या सुरुवातीला चंद्रशेखरबद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली. तिला ‘कुणीतरी’ सतत फोन करत होते.” फर्नांडिसने सांगितले की, तिचा मेकअप आर्टिस्ट शान मुथिल याने तिला फोन उचलण्यास सांगितले ‘कारण तिला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने असे करण्यास सांगितले होते.’ तिने पुढे सांगितले की, या ठगाने त्याचे नाव शेखर रत्न वेला असल्याचा दावा केला.

जॅकलिनने अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी सुकेश चंद्रशेखरला ओळखत नाही. मी त्याला फक्त शेखर रत्न वेला या नावाने ओळखते… त्याने स्वतःची ओळख शेखर वेला अशी करून दिली.’ जॅकलिनने एजन्सीला सांगितले की ‘शेखर’ने दावा केला होता की, तो सन टीव्हीचा मालक आहे आणि तो माजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांचा नातेवाईक आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘शेखरने मला सांगितले की, तो तिचा खूप मोठा फॅन आहे. तिने साऊथमधील चित्रपटातही काम करावे. तसेच सन टीव्ही अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहे. फेब्रुवारीपासून मी त्याच्या संपर्कात होते. त्याने मला त्याचा नंबर दिला… आणि या नंबरवर कॉल करण्यास सांगितले. पैशाच्या व्यवहाराबाबत अभिनेत्रीने माहिती दिली की,”अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला त्याने 1 लाख 50 हजार डॉलर्सचे कर्ज दिले होते.”

याशिवाय सुकेशने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तिच्या भावाला 15 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे तिने सांगितले. जॅकलिनने पुढे सांगितले की,”ती 2009 पासून भारतात राहत आहे. तिचा दुसरा भाऊ रायन हा ऑस्ट्रेलियात राहतो. तर, तिचे पालक एलेरी आणि किम फर्नांडिस बहरीनमध्ये राहतात.”

‘या’ महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या
ठगने तिला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्याची माहिती अभिनेत्रीने दिली. यामध्ये एस्पुएला नावाचा घोडा, गुच्ची आणि चॅनेलच्या तीन डिझायनर बॅग्स, दोन गुच्ची जिमवेअर, लुई व्हिटॉन शूज, हिऱ्याच्या कानातल्यांच्या दोन जोड्या, ब्रेसलेट आणि बरेच काही समाविष्ट आहे. जॅकलिनने असेही सांगितले की,चंद्रशेखरने तिला मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली होती, मात्र तिने ती परत केली. अभिनेत्रीला मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिस्टचाही ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख आहे. चंद्रशेखरने जॅकलिनसाठी अनेक वेळा खासगी जेट आणि हॉटेल्सची व्यवस्था केली होती, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय आरोपपत्रात नोरा फतेहीला मिळालेल्या भेटवस्तूंचीही माहिती आहे. ईडीने फतेहीची चौकशीही केली आहे. चंद्रशेखरने डिसेंबर 2020 मध्ये फतेहीला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आणि नंतर 75 लाख आणि अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा दावा ईडीने केला आहे.

Leave a Comment