चंद्रपूर प्रतिनिधी। चंद्रपुरमधील सिरणा नदीत जायबंदी होऊन खडकांत अडकलेल्या वाघाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारपासून हा वाघ नदीपात्रातील खडकांमध्ये अडकून पडला होता. तेव्हापासून वाघाला वाचवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु होते. मात्र आज पहाटे या वाघाने अखेच श्वास घेतला. वाघाला वाचवण्यासाठी सुरु असलेली मोहीम बुधवारी संध्याकाळी अंधार पडल्याने थांबवण्यात आली होती.
आज पहाटे पुन्हा एकदा ही मोहीम सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच या वाघाचा मृत्यू झाला होता. या वाघाने पुलाखाली उडी मारली होती. त्यामुळे तो जायबंदी झाल्याची माहिती बुधवारी मिळाली. पुलावर दोन चारचाकी गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. त्यावेळी वाघ पुलावर होता. त्या गाड्यांमुळे तो घाबरला असावा आणि त्याने पुलाखाली नदीत उडी मारली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे.
दरम्यान चारगाव गावाजवळील नागोराव पाटील यांच्या शेताशेजारच्या नदीपात्रामध्ये वाघ अडकला होता. या वाघाला वाचवण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वाघाचे तोंड दोन दगडाच्या फटीमध्ये अडकले होते. गेल्या अनेक तासांपासून अडकून पडलेल्या या वाघाचा श्वास सुरू होता. मात्र त्याला झालेली जखम पाहता तो वाचण्याची शक्यता कमी असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली होती. वाघोबाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.