वाघ, बिबट्या नखे विकणार्‍यांना सापळा रचून अटक; 11 नखे जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्या नखे विकणार्‍या टोळीतील दोघांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 11 वाघ व बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. दिनेश बाबूलालजी रावल वय 38, रा. सोमवार पेठ, कराड, अनुप अरूण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी वाघ व बिबट्याची नखे विकणार्‍या संशयितांवर पाळत ठेऊन होते. सोमवारी दिनेश रावल व अनुप रेवणकर हे वाघ व बिबट्याची नख विक्री करणार असल्याची वनविभागाला माहिती मिळाली. यावेळी कृष्णा नाका कराड येथे सावित्री कॉर्नर बिल्डिंगमध्ये असलेल्या सखी लेडीज शॉपी येथे दिनेश रावल हा दोन वाघनख्या घेऊन विक्रीसाठी आला. त्यावेळेस वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला पकडले. पुढे त्याला ताब्यात घेऊन लगेचच दुसरा संशयित अनुप रेवणकर याच्या रविवार पेठ येथील काझी वड्या जवळ असलेल्या मयूर गोल्ड या दुकानात धाड टाकल्यावर त्याच्या जवळ 8 वाघ व बिबट्या नख्या तसेच त्याच्या गळ्यात एक वाघ नख असे एकूण 11 नख वनविभागाने जप्त केले असून दोघां संशयितांना अटक केली आहे.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. मेळघाट व्याघ्र प्रकालचे स्पेशल सेलचे वनरक्षक आकाश सारडा तसेच वनपाल आनंदा सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते, अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम, भारत खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके हे सहभागी झाले होते.

Leave a Comment