नवी दिल्ली । भारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने TikTokसह 59 चिनी मोबाइल Apps भारतात बॅन करण्यात आल्या. दरम्यान, TikTok वर बंदीचा चांगलाचा फायदा ‘चिंगारी’ (Chingari) या एका मेड इन इंडिया मोबाइल अॅपला झाला आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या TikTok या चिनी अॅपला पर्याय म्हणून ‘चिंगारी’ (Chingari) अॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत २५ लाखांहून जास्त वेळेस हे अॅप डाउनलोड झालं आहे.
ओडिशाच्या विश्वात्मा नायक आणि कर्नाटकच्या सिद्धार्थ गौतम यांनी हे अॅप डेव्हलप केलं आहे. “हे अॅप बनवण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. खास भारतीय युजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊ हे अॅप डिझाइन करण्यात आलं आलं आहे”, असं भिलाईमधील रहिवासी आणि चिंगारी अॅपचे चीफ ऑफ प्रोडक्ट सुमित घोष यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
चिंगारी अॅप नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर अधिकृतपणे आलं होतं. पण काही दिवसांपासून भारतात चिनी सामानांचा बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली. “आम्हाला भारतीय युजर्सचा शानदार प्रतिसाद मिळतोय, आणि काही दिवसांमधील आकडेवारीनुसार हे अॅप २५ लाखांहून जास्त डाउनलोड झाल्याचं समोर येतंय”, असं सुमितने सांगितलं. विशेष म्हणजे या अॅपने आता प्ले स्टोअरमध्ये फ्री अॅप्सच्या टॉप चार्टमध्ये जागा मिळवली आहे.
‘चिंगारी’ देत आहे TikTok ला थेट टक्कर
भारतात तयार केलेलं हे अॅप TikTok ला थेट टक्कर देतं. चिंगारी अॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरही करु शकतात. अॅपमध्ये शानदार फीचर्स असून भारतीय भाषांचा सपोर्टही आहे. याशिवाय अॅपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, फनी व्हिडिओ, लव स्टेटस, व्हिडिओ साँग असे अनेक फीचर्स आहेत. चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येतील. व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या युजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”