औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) मधील तसेच कोविड रुग्णालयातील काही कथित कंत्राटी डॉक्टर, सिस्टर, तंत्रज्ञ, कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यामुळे आयटक संघटनेच्यावतीने आज घाटी येथे आंदोलन करण्यात आले.
कोरोना सारख्या कठीण काळात घाटीतील कर्मचाऱ्यांनी धोक्यात घालून काम केले असतानाही त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशाजक वातावरण आहे. कोरोनामुळे सर्वांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अशा मध्ये जवळपास 240 कामगारांना कामावरून काढून टाकल्याने या काळात आम्ही उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे कोरोना काळात आमचा उपयोग करून घेतला आणि आता आम्हाला नोकरीवरून काढण्यात आल्याने आम्ही अडचणीत सापडलो आहेत अशी व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली.
यावेळी आयटक संघटनेच्यावतीने अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले. यावर अभय टाकसाळ, विकास गायकवाड, गजानन खंदारे, महिंद्र मिसाळ, अभिजीत बनसोडे, अरुणाबाई वाहुळे यांच्या सह्या आहेत.