हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपती मंदिरातील (Tirupati Laddu controversy) प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशाचे ऑइल असल्याच्या आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात हे सर्व घडत होते असा आरोप चंद्राबाबूंनी केला. याबाबत कोर्टात याचिका सुद्धा दाखल झाल्यानंतर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी चंद्राबाबूंवर चांगलेच ताशेरे ओढले. देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा असं म्हणत न्यायालयाने चंद्राबाबू नायडू याना झापलं. तसेच याप्रकरणी एसआयटी स्थापन असताना मीडियासमोर बोलायची गरज काय होती असा सवाल सुद्धा कोर्टाने केला.
देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा- Tirupati Laddu controversy
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार वायवी सुब्बा रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेत करण्यात आली आहे. देवाच्या प्रसादावर काही प्रश्नचिन्ह (Tirupati Laddu controversy) असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हंटल, त्यावर कोर्ट म्हणाले की, ‘जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याबाबतचा तपास एसआयटीला दिला आहे. मग तो तपास पूर्ण व्हायच्या आधीच माध्यमांसमोर जाण्याची काय गरज होती? निदान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा.
यानंतर राज्य सरकारची बाजू मांडणारे अधिवक्ता मुकुल रोहतगी म्हणाले की, तुपाच्या तपासात त्रुटी आढळल्या होत्या, त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. मुकुल रोहतगी म्हणाले की, आमच्याकडे लॅबचा अहवाल आहे. सुप्रीम कोर्टाने विचारले की, अहवाल अजिबात स्पष्ट नाही. तुम्ही तपासाचे आदेश आधीच दिले होते, तर मग माध्यमांकडे जाण्याची काय गरज होती? जुलैमध्ये अहवाल आला, सप्टेंबरमध्ये निवेदन आले. कोणतेही ठोस पुरावे नसताना, चौकशी प्रलंबित असताना अशा पद्धतीचे विधान लोकप्रतिनिधीकडून केले जात असेल, तर त्याचा चौकशीवर काय परिणाम होईल? असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला.