टीम हॅलो महाराष्ट्र । जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर दीपिका पदुकोणने जेएनयूला भेट दिली होती. मात्र त्यानंतर तिला अनेकांच्या रोषाला समोर जावं लागत आहे. विशेषकरून सोशल मीडियावर दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या ‘छपाक’ चित्रपटावर बंदीचे आवाहन ट्रॉलर्सकडून केलं जात आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी दीपिकावर टीका करत छपाक चित्रपट बायकॉट करावा, असे आवाहन ट्विटरवरून सुरू केले. यामुळे छपाक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. दरम्यान आता दीपिका पदुकोण आणि छपाक चित्रपटाच्या बाजूने शिवसेना मैदानात उतरली आहे.
दीपिका पदुकोणने उचललेले पाऊल योग्य असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राऊत यांनी म्हटले आहे. छपाक चित्रपटाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून, छपाकवर बंदी घाला, असे आवाहन सोशल मीडियावरून करणे चुकीचे आहे, असे मत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तेथे गेली. तिच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो. दीपिकाची राजकीय भूमिका काय आहे, हे मला माहिती नाही. तिने त्याबद्दल कधी भाष्य केलेले नाही. मात्र, जेएनयूमधील विद्यार्थ्यांप्रति असलेल्या भावना तिने शांतपणे व्यक्त केल्या. केवळ या कारणामुळे तिला देशद्रोही ठरवले जात असेल आणि तिच्या चित्रपटावर बंदी घालण्याचे आवाहन केले जात असेल, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.