औरंगाबाद | पैशांसाठी आजकाल कोण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. याचे अजुन एक उदाहरण आता औरंगाबादेत समोर आले आहे. सन 1998 साली मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरील प्लॉट ती व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून सन 2010 मध्ये खरेदी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात जीपीए अधिकार घेतलेल्या व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, निळकंठ बाके (रा. जोहरीवाडा, औरंगाबाद) यांनी 1973 साली भावसिंगपुरा येथील 3 हजार 76 फुटांचा प्लॉट पेठे यांच्याकडून खरेदी केला होता. ज्याची सरकारी किंमत 7 लाख 50 हजार रुपये आहे. बाके हे नोकरीच्या निमित्ताने नागपुरला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर तेथेच त्यांचा 14 ऑक्टोबर 1998 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या नावावरील प्लॉट त्यांच्या वारसा हक्काने त्यांची तिन मुले एक मुलगी यांच्या नावे करण्यासाठी त्यांनी त्यासंदर्भात कागदपत्रे तक्रारदार सुधीर नाईक यांच्याकडे दिले.
त्या कागदपत्रांच्या आधारे नवीन सातबारा काढण्यासाठी नाईक जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, मृत निळकंठ बाकी यांच्या नावे खोटे खरेदीखत 2010 साली झाल्याचे समोर आले. या खरेदीखताच्या आधारे गुप्ता नावाच्या व्यक्तीला 2017 मध्ये हा प्लॉट विकून टाकल्याने ही दिसून आले. नाईक यांनी अधिक माहिती घेतली असता, गणेश नालेगावकर यांनी हे खरेदीखत केले असून, साक्षीदार म्हणून प्रीतम हरिभाऊ पाटील व दुर्गादास धुमाळ यांनी सह्या केलेल्या आहेत.