थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी बेघरांना निवारा केंद्रात देण्यात येणार गरम पाणी, ब्लँकेट, चादर, सतरंजी आदी सुविधा

सांगली । गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढत आहे. या थंडीच्या लाटेत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी निवारा केंद्रात आसरा देण्यात येईल. त्यांना गरम पाणी, ब्लँकेट, चादर, सतरंजी आदी सुविधा देण्यात येणार आहे. दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत रस्त्यावर व उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व्यक्तींचे निवाऱ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेतर्फे अशा व्यक्तींची शोधमोहीम राबविली जात आहे.

शासनाच्या २४ डिसेंबरच्या परिपत्रकान्वये नागरी बेघर व्यक्तींना सर्व सोयी-सुविधा पुरविणे, राज्यात हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यानुसार रात्री रस्त्यावर, उघड्यावर झोपलेल्या व्यक्तींना तत्काळ जवळच्या निवारा केंद्रात हलविण्यात येणार आहे. त्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठीच्या सर्व सुविधा तत्काळ पुरविण्यात येणार आहेत.

महापालिकेमार्फत मोहीम राबवून उघड्यावर राहणाऱ्या व झोपणाऱ्या बेघरांना निवारा केंद्रात गरम पाणी, ब्लँकेट, चादर, सतरंजी, पलंग यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात कोणाला अशा व्यक्ती आढळल्यास मुस्तफा मुजावर, ज्योती सरवदे, मतीन आमीन, बाळकृष्ण व्हनखडे, किरण पाटील, सुरेखा शेख यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले.