अमरावती प्रतिनिधी । अमरावती वनपरिक्षेत्रात दरवर्षी लागणाऱ्या आगीला लोक कंटाळले असून यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सतत लागणाऱ्या आगीपासून बचावासाठी वनविभाग प्रयत्नशील असून मागील दहा वर्षांत लागलेल्या आगीचा आढावा वनविभागातर्फे घेण्यात येत आहे. यातील मनुष्यनिर्मित आगी किती आणि निसर्गनिर्मित किती याचाही शोध घेतला जाणार आहे.
ताडोबा, पेंच, टिपेश्वर, मेळघाट या वनांचा यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत जंगलक्षेत्रात जाळरेषा तयार करण्याची विशेष योजना राबविण्यात येणार आहे.
आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लॉअर मशीन, ग्रास कटर, अग्निरोधक साहित्य यावेळी खरेदी करण्यात येईल. वन्यजीवांच्या रक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्धार वनमंत्री संजय राठोड यांनी बोलून दाखवला आहे. यासोबतच आग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचंही राठोड म्हणाले आहेत.