महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी संस्कार, मूल्यशिक्षण हवे- ज्योती शेट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. कायद्याबरोबरच कुटुंबातील संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, असे मत महिलांसदर्भातील कायद्याच्या अभ्यासक ज्योती शेट्ये यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित ‘महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. निशा पवार होत्या.

शेट्ये म्हणाल्या, ”महिलांना कायद्याचे संरक्षक कवच आहे. कुटुंबापासून ते सार्वजनिक कामाच्या ठिकाणांपर्यंत सर्वत्र महिलांना कायद्याने अभय दिले आहे. महिला व मुलींवरील अत्याचार थांबावेत यासाठी महाविद्यालये, विद्यापीठे तसेच अन्य संस्थांमध्येही अनेक उपाययोजना केल्या आहेत. एवढे करूनही समाजात महिला असुरक्षित आहेत. केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे. मुलीला समान दर्जा मिळत नाही, तोवर या प्रश्नाची तीव्रता कमी होणार नाही. भारतीय समाजातील मूल्यव्यवस्था टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी मूल्यशिक्षणावर भर दिला पाहिजे.” असं मतं शेट्ये यांनी यावेळी मांडलं.

त्या पुढं म्हणाल्या,”महिलांना आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी कायद्यापेक्षा मूल्यशिक्षण प्रभावी भूमिका बजावू शकेल. यासाठी प्रत्येक टप्प्यावर शिक्षणव्यवस्थेत मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. कायदे कितीही केले तरी त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते यावर त्या कायद्याचे यशापयश अवलंबून असते. भारतात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. किंबहुना खटले निकालात निघण्यासही बराचसा विलंब होते. यावर उपाय म्हणून संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.” असं प्रतिपादन शेट्ये यांनी यावेळी केलं. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment