नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 23 जुलैपासून जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला म्हणजेच ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. यंदाची ऑलिम्पिक जपानच्या टोकियोमध्ये सुरु आहे. या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदकासह 26 वर्षीय मीराबाई चानूनं महिलांच्या 49 किलोग्रॅम वेट लिफ्टिंग स्पर्धेत भारताला या ऑलिम्पिकमधील पहिलं मेडल मिळवून दिले आहे. त्यामुळे भारताला आशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
या कामगिरीमुळे मीराबाई चानू हिचं जगभरातील सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्यात आता मीराबाईंचं अभिनंदन करण्यासाठी नितीन गडकरी, वृध्दिमान साहा, अश्विनी वैष्णव यासारख्या देशातील आघाडीच्या व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच अभिनव बिंद्रानं या पार्श्वभूमीवर मीराबाई चानूसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे.
2008 च्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा अभिनव बिंद्राने आपल्या पत्रात म्हंटले कि, ” Olympics 2020 मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकल्याबद्दल मिराबाई चानू हीचं हार्दिक अभिनंदन. तू अशी प्रेरणादायक कामगिरी केली आहे जी बर्याच काळासाठी लक्षात ठेवली जाईल आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल.” तसेच ही फक्त खेळाची ताकद आहे जी जगातील सर्वच खेळाडूंना एकत्र आणते, त्यांना लढण्याची ताकद देते आणि एकतेच्या भावनेची आठवण करून देते. या खेळामुळेच जगाला नवीन सुपर हिरो मिळतात, त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. या कोरोनाच्या कठीण काळात एकीकडे सगळीकडे जगण्याची धडपड सुरु आहे, अशा काळात तुझ्या जिद्द आणि चिकाटी भरलेल्या विजयामुळे आनंद मिळतो असे अभिनव बिंद्रानं आपल्या पत्रात म्हंटले आहे.