टोल वाढला : बस, ट्रकसह अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपासून 25 रूपये जादा मोजावे लागणार, वाहनचालकांना झटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागल दरम्यानच्या तासवडे (जि. सातारा) व किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या पथकरात ता. 1 जुलैपासून 10 टक्के दरवाढ होणार आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांना झटका बसणार असून खिशाला अर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

तासवडे आणि किणी या टोलनाक्यावर कमीतकमी 5 आणि अधिकाधिक 45 रुपयांपर्यंत 5 पथकरात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक आणि बसच्या पथकरात जास्त वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना आता टोल दरवाढीचाही झटका बसणार आहे. आज बुधवारी मध्यरात्रीनंतर ही नवीन दरवाढ अमलात येणार आहे. सातारा ते कागलपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.

सन 2005 पासून या रस्त्यावरील तासवडे. किणी टोलवरील पथकर वसुली महामंडळाकडून केली जाते. महामंडळाकडून ता. 1 जुलै 2021 पासून नवे पथकर लागू केले आहेत. किणी आणि तासवडे टोलनाक्यांवर मोटर कार, पॅसेंजर व्हॅन, जीपसाठी वनवेसाठी 75 रुपयांवरून 80 रुपये करण्यात आले आहेत. हलक्या मालवाहतूक वाहनांना 135 रुपयांवरून 145 रुपये, ट्रक, बस अवजड वाहनांसाठी 265 वरून 290 अशी पथकरात वाढ झाली असल्याची माहिती टोल व्यवस्थापनाने दिलेली आहे.

You might also like