आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यामध्ये जोरदार वाहू लागले आहेत अशातच महायुती सरकार आता मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. ‘लाडकी बहीण योजना’ असेल किंवा विविध प्रकल्पांचा उद्घाटन असेल महायुती सरकार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसोशीन प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच एक मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर टोल माफीचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आला आहे. चला जाणून घेऊया…
हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी
राज्यामध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू होऊ शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा झाली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोणत्या टोलनाक्यांचा समावेश?
मुंबईमध्ये प्रवेशाचे जे टोलनाके आहेत त्यामध्ये आनंदनगर टोलनाका, दहिसर टोल नाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोल नाका आणि एरोली टोलनाका या पाच टोलनाक्यांचा समावेश करण्यात आला असून या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
आज महायुती सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या अधि कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना अजेंडा दिला गेला नाही त्यामुळे ऐन त्यावेळी अनेक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नाहीतर बोजा जनतेवर माराल ..
दरम्यान टोलनाक्याच्या यांच्या प्रश्नावर नेहमी आग्रही भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाच्या टोलमाफीच्या निर्णयाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे उशिरा का होईना सरकारला सद्बुद्धी मिळाली हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाही तर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.