सातारा प्रतिनिधी । उशिरापर्यंत राहिलेला पाऊस आणि नंतर आलेला अवकाळी पाऊस यांनी शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. एकीकडे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीमधून शेतकरी उभारी घेत असताना मागील काही दिवसांमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली. सोमवारी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७० क्विंटल आवक झाल्याने टोमॅटोची ३ ते ५ रुपये किलोने विक्री झाली. बाजारात टोमॅटो आणण्याचा खर्चही न निघाल्याने येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो चक्क रस्त्यावर टाकून दिला.
दरम्यान सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या आपत्तीवर मात करीत काही शेतकºयांनी भाजीपाल्याच्या बागा जगविल्या. काही दिवसापूर्वी टोमॅटोला १५ ते २० रुपये दर मिळत होता; पण ही परिस्थिती जास्त दिवस टिकली नाही. आवक वाढल्याने दर गडगडू लागले. सोमवारी तर दर ३ ते ५ रुपयांवर आले. त्यामुळे उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक आणि हमालीचा खर्चही निघेनासा झाला आहे. एकीकडे कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना टोमॅटोचे दर पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे.