Tourism : भारताच्या पर्यटन क्षेत्रात सागरी प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईहून थेट अंदमान-निकोबार बेटांपर्यंत क्रूझ सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे मुंबई आता केवळ देशाचे आर्थिक केंद्र न राहता, सागरी पर्यटनासाठी देखील एक महत्त्वाचे केंद्र (Tourism) बनणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटनानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सागरी संपर्काच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. हे टर्मिनल आशियातील एक सर्वात प्रगत आणि उच्च क्षमतेचे टर्मिनल असून दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक पर्यटकांना सेवा देण्याची क्षमता येथे उपलब्ध आहे.
एकाचवेळी 5 आंतरराष्ट्रीय क्रूझ (Tourism)
या क्रूझ टर्मिनलवर एकाचवेळी पाच आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे थांबू शकतात. तसेच येथे 72 इमिग्रेशन काउंटर, लक्झरी प्रवाशांसाठी खास लाउंज, शाकाहारी, जैन आणि हलाल भोजनाची सोय, तसेच प्रवाशांना आकर्षित करणारे फूड कोर्ट आणि सेल्फी पॉइंट्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या येथे सेवा
सध्या कॉर्डेलिया क्रूझेसकडून मुंबईहून गोवा, कोची आणि श्रीलंका मार्गांवर नियमित सेवा दिली जाते. लवकरच रिसॉर्ट वर्ल्ड क्रूझेसकडून देखील पावसाळ्यानंतर नव्या मार्गांवर सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, सर्वाधिक उत्सुकता लागून राहिली आहे ती थेट अंदमान-निकोबार बेटांपर्यंत (Tourism) होणाऱ्या क्रूझ सेवेची.
सौंदर्यसंपन्न अंदमान-निकोबार
अंदमान-निकोबार हे भारतातील एक निसर्गरम्य, जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यटनदृष्ट्या अपार शक्यता असलेले बेटसमूह आहे. पारंपरिक हवाई प्रवासाच्या पर्यायाला जोडून आता समुद्रमार्गे प्रवासाची ही सुविधा सुरू झाल्यास देशांतर्गत पर्यटनाला मोठा चालना मिळेल, असे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या सेवेमुळे पर्यटकांना एका प्रवासात अनेक अनुभव मिळणार आहेत. खोल निळ्या समुद्रावरून प्रवास, भारताच्या किनारपट्टीचा वेगळा नजारा, लांबचा प्रवास करत असताना मिळणारी लक्झरी जीवनशैली, आणि शेवटी पोहोचण्याचे ठिकाण अंदमानची अप्रतिम सौंदर्यसंपन्न बेटे.
या सेवेच्या माध्यमातून केंद्र शासनाचा ‘डेक इन इंडिया’ (Deck in India) व ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाशी सुसंगत अशा प्रकारे सागरी पर्यटन विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर भारतातील मध्यमवर्गीय पर्यटकांसाठीही जागतिक दर्जाचा क्रूझ अनुभव देशातच मिळणार आहे.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही सेवा नियमित करण्यासाठी आवश्यक सर्व आराखडे अंतिम टप्प्यात आहेत. अंदमान-निकोबारच्या या सेवेसोबतच लक्षद्वीपसाठी देखील स्वतंत्र क्रूझ प्रवास सुरू करण्याचे नियोजन आहे.
ही सेवा सुरू झाल्यानंतर पर्यटन उद्योगाला आणि सागरी वाहतूक क्षेत्राला प्रचंड चालना मिळण्याची अपेक्षा आहे. समुद्रमार्गे प्रवास हा केवळ लक्झरी किंवा श्रीमंत वर्गापुरता मर्यादित राहणार नसून तो देशातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील स्वस्त आणि उपलब्ध पर्याय ठरणार आहे.




