Tourism : महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहेत जी आजही इतिहासाची साक्ष देतात. मग गडकिल्ले आहेत लेण्या आहेत यामुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध होतो. कोकणाला देखील असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोकण म्हटलं की सर्वात आधी समुद्रकिनारे आठवतात मात्र कोकणात अशी अनेक ठिकाण आहेत जी इतिहासाची आजही साक्ष देतात. अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे रत्नागिरी येथील कातळशिल्प…
कोकणातल्या अनेक भागांमध्ये मानवी संस्कृतीच्या पाऊल खुणा ठेवणारी कातळ शिल्प आजही आढळतात. कोकणातली ही कातळ शिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे त्यात आता आणखी एका कातळ शिल्पाची भर पडली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळ शिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. एवढेच नाही तर पर्यटन आणि संस्कृती कार्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना देखील जारी केली आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या मार्फत कातळ शिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यानंतर गतकातळ शिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
कुठे आढळले शिल्प ?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या देउड इथं प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळ शिल्प आढळून आले होते. हे कोरलेले मध्याश्मयुगीन म्हणजेच जवळपास 20 हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या कातळावर एक शिंगी गेंडा, गाढव, वानर, हरीण आणि इतर पावलांचे ठसे रेखाटण्यात आले असून एकूण दहा बाय दहा चौरस फूट असे शंभर चौरस मीटर इतके आहे. या कातळ शिल्प परिसरातील 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
राज्यातल्या कातळ शिल्पांबद्दल सांगायचं झाल्यास महाराष्ट्र आणि गोव्याजवळ 900 km क्षेत्रावर ही कातळ शिल्प पसरलेली आहेत. फक्त रत्नागिरीतच 70 ठिकाणी दीड हजार हून अधिक अशा कलाकृती आहेत ज्यातलया सात कलाकृतींना युनिस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली असून कोकणातील ही कातळ शिल्प अरबी समुद्र आणि लगतच्या सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास 170 किलोमीटर लांब आणि 25 किलोमीटर रुंद पट्ट्यामध्ये आढळले आहेत.