हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Train Fire At Tirupati Railway Station । तिरुपती रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेल्वे स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या हिसार एक्सप्रेस आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना आग लागली आहे. ट्रेनच्या २ डब्ब्याना ही आग लागली, मात्र आग लागल्यानंतर, रेल्वे कर्मचाऱ्यांनी बाकीचे डबे यशस्वीरित्या वेगळे केले, ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान झाले नाही. ट्रेनच्या डब्यांना आग लागताच एकच गोंधळ उडाला. परंतु महत्वाची बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेमकं काय घडलं ? Train Fire At Tirupati Railway Station
हिसार एक्सप्रेस आणि रायलसीमा एक्सप्रेस गाड्या एकमेकांना समांतर उभ्या होत्या. त्यामुळे आग लागली तेव्हा दोन्ही गाड्यांचे डबे एकाच वेळी जळू लागले. महत्वाचं म्हणजे ज्या ट्रेनला आग लागली त्याच्या शेजारील ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन येत होती, परंतु ती वेळीच थांबवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी हिसार आणि रायलसीमा एक्सप्रेस रिकामी होती. दोन्ही ट्रेन मध्ये कोणीही प्रवाशी नव्हता त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, वंदे भारत ट्रेनला आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. परंतु आगीचा भडका (Train Fire At Tirupati Railway Station) इतका मोठा होता कि जवळपास १ तास वीजवण्यासाठी लागला. आग आणि धूर इतका तीव्र होता की काही काळ घबराटीचे वातावरण होते. आग विझवल्यानंतर, रेल्वे ट्रॅकवर उभे असलेले जळालेले रेल्वेचे डबे काढण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु सुरुवातीच्या तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा संशय आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या आगीची अधिक चौकशी सुरु आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जुन्या डब्यांमध्ये नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणीचा अभाव अशा घटनांना कारणीभूत ठरतायत का असाही प्रश्न यामुळं समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.




