औरंगाबाद | करमाड टोलनाक्यावर पैसे मागून पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांना देवळाई चौकात 20 ते 25 जणांनी पाठलाग करून जबर मारहाण केली आहे. आम्हाला गुरू मानून आमच्या सोबत रहा असे म्हणत आणि इतर किरकोळ कारणावरून जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी केवळ दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.
संशयिताची साधी चौकशीही केली नसल्याचा आरोप तृतीयपंथी यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीयपंथी आलिया शेख आणि सनम उर्फ सना शेख या करमाड टोल नाक्यावर थांबणाऱ्या वाहनचालकांना पैसे मागून आपला उदरनिर्वाह भागवत होत्या.दोघीही रविवारी रात्री साडेदहा वाजता कर्माडहुन औरंगाबादकडे रिक्षाने येत होत्या. दरम्यान, बाळापुर पासून 20 ते 25 संशयितांनी त्या दोघींचा पाठलाग सुरू केला. त्यानतंर त्यांना देवळाई चौकात थांबविले आणि आलियाला जबर मारहाण केली. मारहाण केलेली पाहून घाबरून सना आणि रिक्षाचालक यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. सुहाना शेख से पंगा लेते हो क्या? असे म्हणत मारहाण केल्याचे तृतीयपंथीयांचे गुरु धन्नो शेख ब्रदर यांचे म्हणणे आहे. मारहाण झालेली माझी शिष्य आहे. तिला पोलिसांकडून चांगली वागणूक मिळाली नाही. आणि उपनिरीक्षकांना विनंती केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. पण केवळ एनसी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला गेला.
दरम्यान, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे म्हणाले की, ‘तक्रार देण्यास आल्यानंतर तृतीय पंथीयांनी पोलिसांनाच ठेवीत धरले होते. त्यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला, त्यांना पोलिसांच्या गाडीत पाठवून वैद्यकीय तपासणी करून घेतली तपासणीच्या अहवाल आल्यावरच पुढील कारवाई केली जाईल’.