राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात हनी ट्रॅपची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एक व्यावसायिक हनी ट्रॅपचा शिकार झाला आहे. यामध्ये आरोपी महिलेने या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून दोन लाख रुपये वसूल केले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरु आहे.
काय आहे प्रकरण ?
जगदंबा कॉलनीत राहणारा 55 वर्षीय मुरारीलाल 15 जानेवारी रोजी शहरातील घंटाघर रोडने आपल्या घरी जात होते. त्यावेळी वाटेमध्ये एका महिलेने त्यांना थांबवून ओळख सांगून दोन हजार रुपयांची मदत मागितली. त्यानंतर व्यापारी मुरारीलालने महिलेला पैसे दिले. यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. यानंतर 18 जानेवारी रोजी भोगीराम कॉलनीत राहणाऱ्या 40 वर्षीय महादेवीने या व्यावसायिकाला पैसे परत करण्यासाठी हाऊसिंग बोर्ड कॉलनी मधील घरी बोलावले.
यानंतर या महिलेने जबरदस्तीने स्वतःचे कपडे काढले. यादरम्यान घरमालक सीताराम घरात घुसले. त्यांनी महिला आणि व्यावसायिकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर घरमालक सीताराम याने व्यावसायिकाकडे चार लाख रुपयांची मागणी केली. जर त्याने ते पैसे दिले नाहीतर व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने दोन लाख रुपयांत सौदा केला. हे पैसे दिल्यानंतरही आरोपी या व्यावसायिकावर दबाव टाकत होते. यानंतर पीडित व्यावसायिकाने आरोपीं विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या सीतारामला ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला फरार असून पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.