मद्यधुंद चालकाचा ताबा सुटून साखरेने गच्च भरलेल्या ट्रकला अपघात; वाहक ठार!

परभणी प्रतिनिधी :  मद्यधुंद ट्रक चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरीजवळ घडली आहे. राज्यरस्ता क्रमांक 61 वर पोहेटाकळी जवळ गोलाईमध्ये शुक्रवार 21 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला आहे.

परभणीतील पाथरी तालुक्यात येणाऱ्या राज्यरस्ता 61 वर असणाऱ्या पोहेटाकळी ते रेणापुर दरम्यान तीव्र वगळण्याचा रस्त्यावर शुक्रवार 21 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाथरी कडून परभणीच्या दिशेने साखरेचे पोते घेऊन जात असलेल्या एम एच 15 सीके 0519 ट्रक चालकाचा मद्यधुंद अवस्थेत गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जात अपघात झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये ट्रक चा समोरील भाग शेताच्या धुऱ्याला आदळल्याने त्याचा चेंदामेंदा झाला. घटनेवेळी गाडीत असणारे साखरेचे पोते केबिनवर गेल्याने वाहक ज्ञानेश्वर शिवाजीराव पावडे वय 45 रा झरी ता. परभणी अडकून गंभीर जखमी झाला.

दरम्यान यावेळी लोकांनी एकच गर्दी केली होती. उपस्थित लोकांनी सुमारे अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर केबिन मधून गंभीर जखमी वाहकाला बाहेर काढण्यास यश आले. अपघातात मात्र चालक सुखरूप वाचला असून घटनास्थळी तो मदधुंद अवस्थेमध्ये दिसून आला. जखमी असलेल्या व्यक्तीस घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले .