Donald Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कोणताही देश शुल्क आकारत होता. आता अमेरिकाही त्या देशांकडून तशाच प्रकारचा टॅक्स आकारणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान होऊ शकते. यामध्ये कृषी, औषधनिर्माण, रसायने, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कापड, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. यातील कृषी क्षेत्रावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात….
भारत जगातला आठवा मोठा कृषी उत्पादनं निर्यात करणारा देश आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या (जीटीआरआय) म्हणण्यानुसार भारत अमेरिकेतून आलेल्या कृषी उत्पादनांवर सरकारी 37.7 टक्के टॅरिफ लावतो. तर अमेरिका भारतातून आयात झालेल्या गोष्टींवर 5.3 टक्के टॅरिफ लावत होती.ट्रम्प यांच्या आदेशानंतर आता हा दर 26 टक्के झाला आहे. व्हाइट हाऊसच्या माहितीपत्रकानुसार, भारतीय आयातीवर 26% शुल्काव्यतिरिक्त, 5 एप्रिलपासून सर्व आयातीवर 10% शुल्क लागू होईल. त्यानंतर, 9 एप्रिलपासून अमेरिकेसोबत ज्या देशांची व्यापारी तूट जास्त आहे, त्यांच्यावर आणखी जास्त शुल्क लादले जाईल.
अमेरिका ही भारताच्या शेती उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.भारत आणि अमेरिकेत 800 कोटी रुपये एवढा द्विपक्षीय कृषी व्यापार होतो. 2024 मध्ये दोन्ही देशांमधील शेती व्यापार 6.6 अब्ज डॉलर्स इतका होता. भारताने 5 अब्ज डॉलर्सची शेती उत्पादने निर्यात केली, तर आयात फक्त 1.5 अब्ज डॉलर्स होती. भारत प्रामुख्याने तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो. तर अमेरिकेतून बदाम, अक्रोड, पिस्ते, सफरचंद आणि डाळी ही उत्पादनं पाठवली जातात.
तसेच भारत अमेरिकेत 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो. टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी कमी पैशात उपलब्ध होतील. पण त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होईल. भारतातून अमेरिकेत जाणारी साखर, प्रक्रिया केलेलं खाद्य आणि कोकोवरही टॅरिफचा परिणाम होणार. त्यामुळं अमेरिकेत भारतीय मिठाई आणि खाद्यपदार्थ महाग होतील. मागणी आणि त्यामुळं निर्यात कमी झाली की, भारतीय कंपन्यांना त्याचं नुकसान झेलावे लागेल.
टॅरिफच्या घोषणेनंतर नारळ आणि मोहरी तेलाच्या किंमती वाढतील. याचा परिणाम मोहरी आणि नारळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर होईल. त्यामुळे भारतातल्या तेलाच्या किमती कोसळतील. त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसेल. थोडक्यात टॅरिफ वाढल्यानं उत्पादनांवर परिणाम होईल. भारतीय शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. अमेरिकेतून आयात वाढेल आणि निर्यात कमी होईल, ज्यामुळे भारताचा शेती व्यापारातील फायदा कमी होऊ शकतो.




