तुकाराम मुंढे उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी; गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद | बदली आणि मुंढे असे जणू समीकरण बनलेले नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले मुंढे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झाल्यानंतर जिल्ह्याचा कारभार सुधारण्यास मदत होईल की राजकीय उलथापालथ होऊन पुन्हा बदली? याविषयी उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिक पालिकेच्या आयुक्तपदी बदली होऊन त्यांच्या जागी नाशिक पालिकेचे आयुक्त मुंढे यांची बदली करण्यात आल्याच्या वृत्ताने दिवसभर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. बदली आणि मुंढे असे समीकरण असल्याने अवैध धंदेचालकांच्या भुवया उंचावल्या गेल्यास नवल नाही. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या कारभारासह वाळू माफिया आणि अवैध धंदेचालकांना शिस्त लावण्यात ते यशस्वी ठरणार की पुन्हा बदली? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. सोलापूर, नांदेड, नाशिक, मुंबई, जालना, पुणे, अशा विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवून गैरकारभार करणार्‍यांना वठणीवर आणल्यामुळे त्यांच्याविषयी उस्मानाबादकरांना देखील आकर्षण आहे.

2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे महाराष्ट्रात ‘सिंघम’ म्हणून ओळखले जातात. नियुक्तीपासून आजवर तपभरात तब्बल 11 वेळा बदलीचा अनुभव घेतलेल्या मुंढे यांनी राजकीय पुढार्‍यांना कधीच जुमानलेले नाही. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याप्रमाणे जिगरबाज अधिकारी उस्मानाबादला लाभल्याचे समाधान सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे. तर बदली होऊन जाणारे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनीही जिल्ह्यातील अनेक प्रश्नांसह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष या नात्याने घेतलेल्या निर्णयांची आठवण उस्मानाबादकरांना कायम राहणार आहे.

Leave a Comment