पुणे | ‘तुला पाहते रे’ या मालिकेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्याने झी मराठी वाहिनी अडचणीत येण्याची चिन्ह आहे. एकतर ही मालिका बंद करावी अथवा त्यात बदल करावेत, अशा आशयाचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिले आहे.
या मालिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱया 20 वर्षीय तरुणीचे 40 वषीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध दाखवले आहेत. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्राला घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे मालिका बंद तरी करावी किंवा त्यात बदल करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपासून मालिकेच्या विरोधात चर्चा सुरु होत्या. तरीही टीआरपीच्या स्पर्धेत मालिकेने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.