हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची कुलदेवी म्हणून ओळखली जाणारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी असंख्य भाविक नेहमी गर्दी करत असतात. यासाठीच नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानाने दर्शन करण्याच्या वेळेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे. तर आता भाविकांना दर्शनाची वेळ कशी राहील , हे आज आपण पाहणार आहोत.
मंदिराचे दरवाजे पहाटे उघडणार –
आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी मंदिराचे दरवाजे पहाटे एक वाजता उघडण्यात येणार आहेत. ही वेळ भाविकांच्या वाढत्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी ठरविण्यात आली आहे. नियमित दिवसांमध्ये मंदिर पहाटे सहा वाजता उघडले जाते, मात्र विशिष्ट दिवशी पहाटे एक वाजल्यापासूनच दर्शनासाठी मंदिर खुले असेल.
असंख्य भाविकांना मोठा दिलासा –
तुळजाभवानी मंदिर संस्थानाने ही वेळ निश्चित करण्यासाठी भाविकांच्या मागण्या आणि पुजारी मंडळाच्या सूचना विचारात घेतल्या. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे अनेक भाविकांना दर्शनासाठी लांब थांबावे लागते. त्यामुळे या नव्या वेळापत्रकामुळे गर्दी कमी होण्यास मदत मिळेल. तसेच सर्व भाविकांना सहज देवीचे दर्शन करता येणार आहे. या निर्णयामुळे असंख्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गर्दीचे नियोजन करण्यात मदत –
तुळजाभवानी मंदिराचे महत्त्व लक्षात घेता, सुट्ट्या आणि धार्मिक पर्वांमध्ये येथे भाविकांची संख्या अधिक वाढते. पौर्णिमा, नवरात्र, श्रावण महिना अशा विशेष काळांमध्ये दर्शनासाठी अनेक भाविक तुळजापूर गाठतात. नव्या वेळापत्रकामुळे मंदिरातील व्यवस्थापनाला गर्दीचे नियोजन करण्यात मदत होईल आणि भाविकांना रात्रीपासूनच दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे हा निर्णय भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे.