हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या तूर उपलब्धच नाही आहे. त्यामुळे सध्याचा भाव हा शेतकऱ्याला मिळत नसून तो व्यापाऱ्यांना मिळतो आहे. ज्याचा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही.
तुरीचा शासकीय हमीभाव ५८०० रुपये आहे, मात्र सध्या राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला ९,५०० दर मिळतो आहे. मात्र तुरीला हा भाव येण्यापुर्वीच शेतकऱ्यांनी आपल्या जवळची तूर विकली आहे. मजुरांचा पगार आणि इतर खर्च देणे असल्यामुळे तूर विकल्याचे एका शेतकरी बांधवानी सांगितले आहे. केवळ वाशिम जिल्ह्यात १ लाख ९ हजार २३१ क्विंटल तूर शासनाने ५, ८०० या भावाने विकत घेतली आहे. मात्र आजच्या दराशी तुलना केली असता सध्या शेतकऱ्याचे ३००० रुपये नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सरकारला मात्र या खरेदीमुळे साधारण ३० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. अशाच प्रकारे राज्यातील इतर जिल्ह्यांमधून ही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. म्हणूनच सरकारने आधारभूत किंमतीने विक्री केलेल्या नफ्यामधून शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी होते आहे.
https://www.facebook.com/112232597236227/posts/157917196001100/
तूर काढणीच्या आधीच नोंदणी झाल्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला नाही उलट नुकसानच झाले आहे. काढणी झाल्यानंतर नोंदणी सुरु होणे गरजेचे आहे असे एका शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता संचारबंदीमुळे थांबलेले व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत. असे असले तरी खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आता दरवाढ होते आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होणार असल्याची लक्षणेही दिसू लागली आहेत.