ठाणे-बोरिवली प्रवासाला ‘टर्बो स्पीड’! 2 तासांचे अंतर आता फक्त 20 मिनिटांत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी! ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १८,८३८ कोटी रुपयांचा खर्च, ११.८५ किमी लांबीचा सहा पदरी मार्ग आणि त्यातल्या १०.२५ किमी लांबीच्या टनेलसह हा प्रकल्प मुंबईतील वाहतुकीत ऐतिहासिक क्रांती घडवू शकतो.

या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे मागाठाणे परिसरातील ८७ झोपडीधारकांचे पुनर्वसन आता तोही दूर झाला आहे. झोपडीधारकांना नव्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या असून, त्यामुळे टनेल रोडच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात आता प्रत्यक्षात होत आहे. येत्या आठवड्यात कामाला सुरुवात होणार असून, हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर घोडबंदर रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडीसही मोठा दिलासा मिळणार आहे.

स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, उपजिल्हाधिकारी रोहिणी फडतरे, आणि पंकज सोनवणे यांच्या उपस्थितीत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली. या टप्प्यानंतर, ठाणे-बोरिवली प्रवासाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.