औरंगाबाद | येत्या तीन दिवसांमध्ये बारावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचे काम का जवळपास पूर्ण झालेले आहे. अशी माहिती विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा जून महिन्यात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पुढच्या महिन्यातच मूल्यमापन कार्यपद्धती ठरवण्यात आली. आणि याच मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचा निकाल लावण्याचा मंडळाने निर्णय घेतला. आता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कामकाज 99 टक्के पूर्ण झाले आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 13 लाख 23 हजार 698 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 लाख 22 हजार 249 विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील बारावीचा निकाल 31 जुलै पूर्वी जाहीर होईल असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून अगोदरच शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.