चार भिंती अन् मंडपात बारावीचे परीक्षा केंद्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – विनाप्लास्टरच्या उभ्या केलेल्या चार भिंती… दरवाजे अन् खिडक्यांसाठी तयार केलेल्या चौकटी बिनबोभाट तशाच उघड्या… छप्पर तर नाहीच… अन् ऊन लागू नये म्हणून चक्क लग्नासाठी टाकतात तसा मंडप टाकलेला… हे चित्र दुसरीकडे दिसले असते तर त्याची फारशी चर्चा झाली नसती. पण बारावीच्या एका परीक्षा केंद्रावरील ही वस्तुस्थिती असल्याने विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर कसा दिला असेल, याची कल्पनाच करवत नाही !

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला शुक्रवारी सुरवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने प्रशासनाकडून जोरदार नियोजन केल्याचा दावा केला जातो. परंतु, पहिल्याच पेपरला ग्रामीण भागातील केंद्रांवर सुविधांचा अभाव दिसून आला. निलजगाव येथील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर चार भिंती अन् वर मंडप अशा ठिकाणी घामाघूम झालेले विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभाग, एसएससी बोर्ड व पोलिस प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली असली तरी, ग्रामीण भागात काही केंद्रावर नियमावली धाब्यावर बसविण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सकाळी दहापासून पेपर घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर परीक्षार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या वरती लग्नमंडपाचे कापड टाकून शेड तयार करण्यात आले होते. या शेडमध्येच विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी बसविण्यात आले होते.

सध्या या शाळेचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे तेथे परीक्षा हॉलमध्ये वाळूचा चाळणा देखील ठेवण्यात आला होता. येथील परीक्षा कक्षात फॅन, लाईट अशी कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे विद्यार्थी घामाघूम होऊन अंधाऱ्या खोलीत पेपर सोडवित होते. या परीक्षा घेण्यात येत असलेल्या वर्गांना ना खिडक्या होत्या, ना दरवाजे. त्यामुळे केंद्राबाहेर जमलेले विद्यार्थ्यांचे मित्र, नातेवाईक शाळेच्या भिंतीवर खिडकीतून चढून कॉपी पुरवत होते. मात्र, त्यांना कोणीही अडवताना दिसले नाही. भरारी पथकाला देखील या ठिकाणीच काहीच आढळून आले नाही हे विशेष! याबाबत विचारणा केली असता शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment