दोन वर्षापूर्वीची चोरी उघडकीस : अडीच लाखांचे दागिने सैदापूरातील चोरट्यांकडून हस्तगत

सातारा | सैदापूर ता. सातारा येथील सैन्य दलातील निवृत्त कॅप्टनच्या घरातून 2 वर्षांपूर्वी चोरीस गेलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने एलसीबीने हस्तगत केले. यावेळी पसार असलेल्या संशयित आरोपी अनिल नागराज गोसावी (वय- 35, रा. यशवंत नगर, सैदापूर, ता. सातारा) यालाही अटक करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैन्य दलातून निवृत्त झालेले कॅप्टन यांच्या सैदापूर येथील घरातून 2019 साली ते कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5 तोळे 1 ग्रॅम वजनाचे दागिने ऐवज चोरून नेले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाला.

एलसीबीने या घटनेचा त्यावेळी तपास करुन अवघ्या चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणला होता. मात्र, सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत झाले नव्हते. पोलिसांनी तपास केल्यानंतर सैदापुरातील अनिल गोसावी हा चोरी झाल्यापासून गाव सोडून गेला असल्याची माहिती समोर आली. एलसीबीला संशयिताचा दोन दिवसांपूर्वी सुगावा लागल्यानंतर अनिल गोसावी हा त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे या घरफोडी संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने घरफोडीची कबुली दिली.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग सावळे, फौजदार गणेश वाघ, पोलिस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विश्वनाथ संकपाळ, संतोष सपकाळ, शिवाजी भिसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.